श्री समर्थ रामदास स्वामींचे चरित्र
कुलवृत्त, जन्म व बालपण (पहिली 12 वर्षे -इ. स. 1608 ते 1620) -
श्री समर्थ रामदास स्वामींचे पूर्वज कृष्णाजीपंत ठोसर हे दुष्काळ व राज्यक्रांतीमुळे बेदर प्रांत सोडून शके 884 ( इ.स. 962) साली गोदावरीतीरी हिवरे येथे येऊन राहिले. यांना पांच पुत्र होते. शेवटचा पुत्र दशरथपंत याने कसबे जांब हे गांव वसविले व स्वपराक्रमाने बाजूच्या बारा गावांचे कुलकर्णीपद मिळविले. हे रामोपासक व वैराग्यशील होते. कृष्णाजीपंतांपासून श्री समर्थांचे वडील सूर्याजीपंत हे तेविसावे पुरुष, यांचा जन्म शके 1490 (इ.स. 1568) साली जांब गांवी झाला. हे सूर्याची व रामाची उपासना करीत. रामनवमी उत्सव करीत.यांची पत्नी राणूबाई सुशील, धर्माचरणतत्पर व वैराग्यशील पतिव्रता होती. या दोघांना सूर्याच्या कृपेने शके 1527, मार्गशीर्ष शुक्ल 3 (इ.स. 1605) या शुभदिनी प्रथम पुत्र झाला. त्याचे नांव गंगाधर ठेवले. हे गृहस्थाश्रमी होते. हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, गोत्र - जमदग्नी, सूत्र - आश्वलायन. श्रेष्ठ गंगाधर यांचे लग्न शके 1534 (इ.स. 1615) साली झाले. यांना प्रत्यक्ष रामाचा अनुग्रह होता. शके 1537 (इ.स. 1516) ला सूर्याजीपंत परंधामास गेल्यावर कुटुंबाची सर्व जबाबदारी श्रेष्ठांनी सांभाळली. ते गृहस्थाश्रमी असले तरी सत्वशील, सदाचारसंपन्न व भक्तिज्ञान वैराग्याने परिपूर्ण होते. यांचे भक्तिरहस्य व सुगमोपाय हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सूर्याजीपंतांच्या निधनानंतर श्रेष्ठ गंगाधरपंत लोकांना अनुग्रह देत असत.
श्रेष्ठांच्या जन्मानंतर सूर्याजीपंतांना रामकृपेने शके 1530 - चैत्र शुक्ल 9 - रामनवमी (इ.स. 1608) या शुभमुहूर्तावर दुसरा पुत्र झाला. त्याचे नांव नारायण ठेवले. हे नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजेच श्री समर्थ रामदास स्वामी.
वयाच्या पाचव्या वर्षी नारायणाची मुंज झाली. बुद्धी तीव्र असल्यामुळे त्याचे प्राथमिक अध्ययन संस्कृतासह लवकर झाले. अध्ययनाबरोबरच सूर्यनमस्कार मल्लविद्या यांचा अभ्यास करून नारायणाने अचाट शरीरसामर्थ्य मिळविले. बालपणी नारायण फार हूड व खोडकर होता. त्याला मुलांबरोबर गोट्या खेळणे, रानावनात हिंडणे, झाडावर चढणे, पाण्यात डुंबणे आणि एकांतात जाऊन बसणे असे छंद होते. " समर्थ प्रतापात " गिरीधर स्वामी म्हणतात -
समर्थ क्रीडेचे अदभूत लक्षण । अष्ट जुत्पती सवंगडे जाण ।
गोट्या बोटे टिचिती पूर्ण । एक शेर पूर्ण संभारे ॥
वृक्ष सरोवरी उड्या घेती । रानीवनी सर्वदा असती ।
यथा स्वलीला ग्रामांत येती । परमप्रतापी अनावर ॥
सर्वकाळ सवंगड्यांबरोबर नारायणाचे हिंडणे राणूबाईंना आवडत नसे. एकदा त्या रागावून नारायणाला म्हणाल्या, "नारोबा, पुरुषांना काहीतरी संसाराची काळजी पाहिजे." हे शब्द ऐकून सर्वांच्या नकळत नारायण अडगळीच्या खोलीत जाऊन बसला व आसनात बसून चिंतनात मग्न झाला. सगळीकडे शोधाशोध झाली. राणूबाईंना फार काळजी वाटली. काही कामानिमित्त राणूबाई त्या अडगळीच्या खोलीत गेल्या, तेव्हा नारायणाचा पाय लागून दचकल्या. नारायण आहे असे समजतांच त्या म्हणाल्या, "नारोबा, येथे अंधारात काय करतोस ?" त्यावर नारायणाने उत्तर दिले, "आई, चिंता करीतो विश्वाची" - (समर्थ प्रताप 2 - 22). एकदा घरी काही कार्यक्रम होता. त्यासाठी ताकाची गरज होती. हे नारायणाला समजताच त्याने कुंभाराकडून 11 गाडगी आणून 11 घरांतून ताक मागितले व पहाटेच ती सर्व गाडगी ताकाने भरून स्वयंपाकघरात आणून ठेवली. सकाळी राणूबाई पाहतात तो जिकडे तिकडे ताकच ताक दिसले. याप्रमाणे नारायणाच्या अचाट बुद्धीच्या, शक्तीच्या व दैवी कृपेच्या अनेक बाललीला चरित्रकारांनी वर्णिल्या आहेत.
एके दिवशी नारायणाने आपणाला अनुग्रह द्यावा असा हट्ट श्रेष्ठ गंगाधरांकडे धरला तेव्हा, तुझे वय लहान आहे, आताच गडबड करू नकोस असे श्रेष्ठ म्हणाले. म्हणून नारायणाने रुसून मारुती मंदिरात जाऊन अनुष्ठान केले. मारुतीकृपेने नारायणाला श्रीराम दर्शन झाले व प्रभू रामचंद्राने प्रत्यक्ष अनुग्रह करून श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा उपदेश केला. अनुग्रह झाल्यावर नारायण मौनव्रत धारण करून एकांतात राहू लागला. राणूबाईंनी त्याचे लग्न करायचे ठरवले. या गोष्टीला नारायण मान्यता देईना. तेंव्हा अंतरपाट धरीपर्यंत बोहोल्यावर उभे राहण्याची शपथ घालून वचनबद्ध करून घेतले. नंतर जवळच असलेल्या आसनगांवच्या भानजीपंत बोधलापूरकर (राणूबाईंचे बंधू) यांची मुलगी वधू म्हणून निश्चित केली. गोरज मुहूर्तावर लग्न ठरले. सर्व मंडळी जांबेहून आसनगांवला आली. वर वधू यांस समोरासमोर उभे करून अंतरपाट धरला व ब्राह्मण मंगलाष्टके म्हणू लागले. "शुभमंगल सावधान" चा घोष झाला. सावधान शब्दाने सावध झालेला नारायण विश्वप्रपंच करण्यासाठी लग्नमंडपातून पळाला. नारायणाचा शोध लागत नाही असे पाहून त्या वधूचे श्रेष्ठांच्या माहितीतल्या दुस-या वराशी त्याच दिवशी लग्न झाले. नारायण सर्वसंग परित्याग करून शके 1541 (इ.स. 1620) फाल्गुन शुक्ल अष्टमीस लग्नमंडपातून पळाला व गोदावरी पार करून 22 दिवसांनतर चैत्र शुद्ध प्रतिपदेस नाशिक पंचवटी येथे राममंदिरात आला.एवढ्या लहान वयात माता, बंधू, घर यांचा त्याग करून तपश्चर्येचे ध्येय ठेवणे ही सामान्य गोष्ट नव्हती. मोरोपंत म्हणतात -
द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती । ते एक रामदासे आयकिले, त्या असो सदा प्रणती ॥
अवघ्या बाराव्या वर्षी जगदोद्धाराकरीता लग्नमंडपातून पळून गेल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात आढळून येत नाही.