श्री समर्थ रामदास स्वामींचे कार्य

राष्ट्रोद्धाराचे आणि धर्मोद्धाराचे ध्येय समर्थांच्या पुढे होते. ते ध्येय गाठण्यासाठी समर्थांनी आधी स्वत: 12 वर्षे तप:श्चर्या करून रामकृपा संपादन केली. शारिरीक सामर्थ्य आणि तप:सामर्थ्य मिळविल्यानंतर 12 वर्षे अखंड भारतभ्रमण करून देशस्थिती आणि धर्मस्थिती अवलोकन केली. त्यांच्या लक्षात आले की अनेक शतके पारतंत्र्यात जखडून परकीयांच्या अत्याचाराला बळी पडून भारतीय समाज अत्यंत दीन झाला आहे. त्याच्यात आत्मविश्वास उरलेला नाही. वैदिक धर्म लोप पावून परधर्म लादला जातआहे. शक्ती असून ती संघटीत नसल्यामुळे परकीयांचा अत्याचार चालूच आहे. गुलामगिरीत राहून परकीयांची सेवा करण्यातच शूरांना धन्यता वाटत आहे.

या परिस्थितीला कलाटणी देण्यासाठी समर्थांनी कृष्णातीर हे कार्यक्षेत्र निवडले. जागोजागी मारुती स्थापना करून रामनवमीचे उत्सव सुरु केले. लोकांना प्रथम उपासनेला लावले. शिष्यपरिवार वाढल्यानंतर चाफळ येथे भव्य राममंदिर उभारुन समर्थ संप्रदायाचा पहिला मठ उभारला. आपल्या शिष्यांना युक्ती, बुद्धी, विवेक, विचार तसेच शक्ती यांनी युक्त केले. मनोबोध व दासबोध यांसारखे ग्रंथ रचले आणि आचरण संहिता तयार केली. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी मठ स्थापन करून आपल्या अधिकारी शिष्यांना तेथे पाठविले व त्यांच्या मार्फत रामोपासना सर्वत्र रुजवली. लोकांचा आत्मविश्वास बळकट केला.

शिवाजी महाराजांसारख्या यशवंत किर्तीवंत राजाला सल्ला देऊन राजधर्माचा , क्षात्रधर्माचा उपदेश केला. हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे आणि धर्मरक्षण व्हावे म्हणून

" तुझा तू वाढवी राजा । शीघ्र आम्हाची देखता "

अशी भवानी मातेला प्रार्थना केली व जागोजागी धर्मरक्षणार्थ कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. समर्थांच्या तेजस्वी वाणीने महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण झाले. पारतंत्र्याची चीड येऊन स्वराज्य स्थापनेविषयी जनमानसात उत्कंठा निर्माण झाली. मनाचे श्लोक, दासबोध व इतर अफाट वाङ्मय निर्माण करून देशभक्ती व ईशभक्तीचा प्रसार केला. शिष्यांना ज्ञान देऊन त्यांच्याकडून निष्काम कर्मयोग आचरवून धर्मस्थापनेचे कार्य करविले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि या शिवसमर्थ युतीमुळे वैदिक धर्माची पुनर्स्थापना झाली. समर्थांना अपेक्षित असे लोककल्याण महाराष्ट्रात झाले. त्यासाठी समर्थ वयाच्या बाराव्या वर्षापासून अखेरपर्यंत एकही क्षण व्यर्थ न घालवता बहुजन हितार्थ झटले आणि आपल्या मागे लोकांच्या मार्गदर्शनार्थ दासबोधादी अफाट ग्रंथवाङ्मय ठेवले.

आजही समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करून अनेक लोक कृतार्थ होत आहेत.