प्रकाशन विभाग - सज्जनगड

ज्याचा जीर्णोद्धार व्हावयास पाहिजे अशी श्रीसमर्थ पदरजाने पुनीत झालेली स्थाने असंख्य आहेत. ती सर्व होणे कठीणच. तथापि जेवढी जीर्णोद्धार करता येणे शक्य आहे तेवढी केल्यानंतर श्रीसमर्थ सेवा मंडळाने आपली दृष्टी समर्थ वाङ्मय प्रकाशनाकडे वळवली.

सज्जनगडावरील वाङ्मय प्रकाशन विभाग कै. बाबुराव वैद्य यांनी इ. स. 1954 साली सुरु केला. प्रारंभी सचित्र सज्जनगड ही मराठी व इंग्रजी पुस्तिका प्रकाशित झाली. त्यानंतर मनाचे श्लोक, श्रीसमर्थ चरित्रामृत, आत्माराम, सटीप दासबोध, श्री. ज. स. करंदीकर कृत श्रीसमर्थ चरित्र, निरनिराळ्या प्रकारचे समर्थांचे फोटो छापले. परंतु समास संगती, दशक संगती व ओव्यांचे विवरण करणारा सार्थ दासबोध उपलब्ध नाही ही खंत वाटत होती. समर्थकृपेने रामभक्त प्रा. के. वि. बेलसरे, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आनंदाने या विनंतीचा स्वीकार करुन एक वर्षाच्या अवधीत स्पष्टीकृत अशी श्रीमत् दासबोधाची छापण्यास योग्य प्रत तयार करुन श्रीसमर्थ सेवा मंडळाच्या ताब्यात दिली. साधकांना सुलभतेने कळावा अशी याची मांडणी आहे. अशा पद्धतीने श्रीसमर्थ सेवा मंडळाने 1100 पानांचा `सार्थ दासबोध' हा प्रासदिक ग्रंथ फक्त 50 रु. इतक्या अल्प किंमतीत इ. स. 1975 साली साधकांकरीता उपलब्ध केला. या ग्रंथाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन त्यावेळचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री माननीय श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या ग्रंथाच्या आत्तापर्यंत 26 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यानंतर श्रीसमर्थ सेवा मंडळाने अनेक ग्रंथ व सीडीज प्रकाशित केल्या असून त्याची यादी पहावी.

त्याचप्रमाणे अमेरिकेचे नागरीक असलेले दासबोधाचे दृढ व्यासंगी श्री. डेव्हिड मो यांनी संपादित केलेला दासबोधाचा इंग्रजी अनुवाद श्रीसमर्थांच्या संक्षिप्त चरित्रासहित श्रीसमर्थ सेवा मंडळाने प्रकाशित केला आहे.

श्रीसमर्थ सेवा मंडळाने प्रकाशित केलेले हे सर्व ग्रंथ आणि सीडीज सज्जनगडावरील मंडळाच्या दोन पुस्तक विक्री केंद्रातून तसेच पादुका प्रचार दौ-यातही उपलब्ध आहेत. बाहेरील ग्रंथ विक्रेत्यांना मागणीनुसार गडावरुन श्रीसमर्थ सेवा मंडळ, प्रकाशन विभागातर्फे सवलतीच्या दरात पुस्तके पाठविली जातात.

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांची प्रकाशन पुस्तके मागविण्याचा पत्ता :

प्रकाशन विभाग -

श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड (रजिस्टर्ड संस्था)
मु. पो. सज्जनगड, ता. जि. सातारा - 415013