प्रारंभ आणि विस्तार :
सज्जनगड मासिकाच्या नोव्हेंबर 1978 च्या अंकामध्ये पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमाचा पहिला लेख प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये एका समासावर 5 प्रश्न काढले होते. त्यावरील उत्तरांचा मासिकाच्या संपादकांकडे इतका ढीग पडला की त्यासाठी वेगळी योजना राबवणे गरजेचे आहे असे तत्कालिन संपादक स. भ. आण्णाबुवा कालगांवकर यांना वाटले. याकरीता डिसेंबर 1978 साली सज्जनगडावर विशेष सभा घेण्यात आली. मासिकात एक वर्षापर्यंत लेख प्रसिद्ध करण्याचे ठरले. 176 अभ्यासार्थींनी 12 स्वाध्याय पाठवून अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रशस्तिपत्रकांचे वितरण 26 डिसेंबर 1979 रोजी सज्जनगडावर श्रीसमर्थ समाधीजवळ माननीय किसन महाराज साखरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मा. किसन महाराज साखरे म्हणाले, “आज या उपक्रमाची सांगता नव्हे, तर अनेक वर्षे जोमाने चालणा-या उपक्रमाचा हा शुभारंभ आहे असे मी मानतो.” अशा पद्धतीने श्रीसमर्थ सेवा मंडळाने या उपक्रमाचा अंगिकार केला. अभ्यासार्थींची संख्या अपेक्षेपेक्षा खूपच वाढल्यामुळे या अभ्यासक्रमात समीक्षक पद्धतीचा उगम झाला. त्यानंतर इ. स. 1980 मध्ये 652 अभ्यासार्थींना प्रशस्तिपत्रके देण्याचा सोहळा सज्जनगडावर संपन्न झाला. याकरीता 18 समीक्षकांनी प्रवेश या पहिल्या स्तरासाठी कार्य केले. दुस-या स्तराचे नांव दासबोध परिचय असे ठरविले गेले. तिस-या स्तराला दासबोध प्रबोध असे नांव दिले. इ. स. 1981 साली एक हजार प्रस्तिपत्रकांचे वाटप सज्जनगडावर झाले. यावरुन या उपक्रमाच्या प्रगतीचा वेग लक्षात येतो. दासबोधातील विवेक - वैराग्य, प्रयत्न - प्रचिती, लोकसंग्रह इत्यादी विषयांवरील प्रकल्पांची हस्तलिखिते तयार करण्यात येऊ लागली. गांवोगांवी दासबोध अभ्यास मंडळे चालविण्यात येऊ लागली. दरवर्षी डिसेंबर महिन्यात अभ्यासार्थींचा मेळावा व प्रशस्तिपत्र वितरणाचा कार्यक्रम सज्जनगडावर होऊ लागला. महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात येथूनही अभ्यासार्थी संमेलनासाठी गडावर येऊ लागले.
तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी जे समास निवडण्यात आले त्यासाठी प्रवेश, परिचय आणि प्रबोध या तीन वर्षांची पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. त्यासाठी अनेकांनी अर्थसहाय्य केले. ह्या उपक्रमाचा आलेख आजतागायत वाढतच गेला असून आता गुजराती, कन्नड, हिंदी अशा अन्य भाषेतूनही चालत आहे. त्यासाठी निरनिराळ्या भागांत उपकेंद्रे स्थापन केली आहेत व तेथील केंद्रसंचालक उत्तम कार्य करीत आहेत. इ. स. 1978 पासून इ. स. 2008 पर्यंत स. भ. द्वा. वा. केळकर व त्यांच्या पत्नी सौ. गीताताई केळकर यांनी अपार कष्ट घेऊन हा उपक्रम नांवारूपाला आणला. परंतु वयोमानानुसार त्यांना हे कार्य पुढे चालविणे कठीण झाल्यामुळे हा उपक्रम इ. स. 2009 पासून `ग्रंथराज दासबोध अध्ययन' या नांवाने श्री. अशोक गानू यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. श्री. गानू यांच्यासह नऊ जणांची `ग्रंथराज दासबोध अध्ययन समिती' श्रीसमर्थ सेवा मंडळातर्फेच स्थापन करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ह्या उपक्रमाचा लाभ सुमारे एक लाखापेक्षा जास्त अभ्यासकांनी घेतला असून त्यातूनच सुमारे 5000 समीक्षक तयार झाले आहेत.
21 वर्षांवरील कोणासही या उपक्रमात प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रक्रिया 1 जानेवारी ते 1 मार्च या कालावधीत होते. अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून त्याकरीता कोणतेही प्रवेश शुल्क नाही. दरवर्षाच्या शेवटी प्रशस्तिपत्रक दिले जाते.