श्री समर्थ विद्यापीठ, शिवथरघळ

श्रीमत् परमहं परिव्रजकाचार्य भगवान श्रीधरस्वामी महाराज यांच्या प्रेरणेने श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड या संस्थेची स्थापना शके 1872 इ. स. 1950 मध्ये झाली. श्रीसमर्थ विद्यापीठ हा श्रीसमर्थ सेवामंडळाचाच एक भाग आहे.

श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या शिकवणुकीचा, तत्त्वज्ञानाचा व महाराष्ट्र धर्माचा विविध मार्गांनी प्रचार व प्रसार करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी अनेक उपक्रम राबविते. त्यात सज्जनगडावर यात्रेकरुंना मोफत अन्नदान, नि:शुल्क निवास व्यवस्था, श्रीसमर्थांच्या पादुकांवर अभिषेक, नित्य उपासना, गोशाळा, समृद्ध ग्रंथालय, गडावर युवकांसाठी, साधकांसाठी अनेक शिबीरे, अभ्यासवर्ग, श्रीसमर्थ संप्रदायाचे संघटन, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर भिक्षा दौरे व त्यायोगे श्रीसमर्थ विचारांचा प्रसार, दासबोधाचे जन्मस्थान असणा-या शिवथरघळ या स्थानाची व्यवस्था, जीर्णोद्धार, सातारा शहरातील समर्थ सदन येथे प्रशस्त असे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह व तेथे `संत ज्ञानपीठ' हा ज्ञानदानाचा उपक्रम, समर्थ साहित्याचे प्रकाशन व विक्री, `सज्जनगड मासिक पत्रिका' हे समर्थ विचारांचे मासिक चालविणे, विविध शहरांतील सेवा मंडळाच्या केंद्राद्वारे कार्य इत्यादी अनेकविध उपक्रम श्रीसमर्थ सेवा मंडळ चालविते.

श्रीसमर्थ सेवा मंडळाच्या उपक्रमांपैकी `पत्रद्वारा दासबोध' त्याचेच बदललेले नांव `ग्रंथराज दासबोध अध्ययन' आणि श्रीसमर्थ विद्यापीठ असे आणखी दोन उपक्रम आहेत. त्याद्वारा असंख्य समर्थभक्त व जिज्ञासूंना श्रीसमर्थ विचारांचे अध्ययन करण्याची सोय श्रीसमर्थ सेवा मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. ग्रंथराज दासबोध अध्ययनाचे काम पुणे येथून चालते.

श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड ही रजिस्टर्ड संस्था आहे (रजि. नं. N. S. F. - 1)

श्रीसमर्थ विद्यापीठाची स्थापना -

श्रीसमर्थ विद्यापीठाची स्थापना दासबोधाचे जन्मस्थान असणा-या शिवथरघळ (महाडजवळ), जि. रायगड, येथे आषाढ शुद्ध एकादशी शके 1908 (जुलै 1986) या दिवशी झाली. श्री. मुरलीधर दत्तात्रय उर्फ मामा गांगल यांच्या पुढाकाराने व त्यांच्या 15 - 20 कार्यकर्त्याच्या सहाय्याने हे विद्यापीठ शिवथरघळ येथे स्थापन झाले, म्हणून विद्यापीठाच्या नांवात `शिवथरघळ' असा उल्लेख आलेला आहे.

`भारतीय संस्कृती दर्शन परीक्षा' या नांवाने, प्रारंभीच्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत विद्यापीठ आपल्या परीक्षा घेत असे. प्रथमा, द्वितीया, मुमुक्षू, साधक व उपासक अशी या परिक्षांची नांवे होती तसेच मनोबोध परीक्षाही घेतल्या जात असत.

विद्यापीठाचे कार्य पहिले एक तप शिवथरघळीतून चालले. परिक्षांच्या जोडीला विद्यार्थी व युवकांसाठी, प्रापंचिकांसाठी शिवथरघळीत शिबीरे घेण्याचा उपक्रमही विद्यापीठाने राबविला आहे.

कै. मामा गांगल यांच्या पश्चात विद्यापीठाची धुरा कुलसचिव म्हणून समर्थभक्त गो. स. तथा आप्पा पाटगांवकर यांनी पुढच्या एक तपापेक्षा अधिक काळ सांभाळली. त्यांचे वास्तव्य कोल्हापूर येथे असल्याने विद्यापीठाचे कार्य कोल्हापूर येथून चालत असे. त्यांनी या कार्याचा विस्तार महाराष्ट्रभर केला. वयोमान व प्रकृतीमानाने त्यांना काम करणे शक्य होईना, तेव्हा विद्यापीठाचे प्रधान कार्यालय जून 2012 पासून समर्थ सदन, सातारा येथे आणण्यात आले. अ‍ॅड. डॉ. डी. व्ही. देशपांडे, सातारा यांनी तेव्हापासून विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून धुरा सांभाळली आहे.

समर्थभक्त मारुतीबुवा रामदासी - कुलपती

विद्यापीठाचे कुलपती म्हणून श्री. रा. ना. तथा बन्याबापू गोडबोले, स. भ. आण्णाबुवा कालगांवकर इत्यादींनी विद्यापीठाचे कुलपती म्हणून प्रारंभीच्या काळात काम पाहिले. आता गेल्या दीड तपाहून अधिक काळ भगवान श्रीधरस्वामींचे अनुग्रहित व गेली सुमारे साठ वर्षे श्रीसमर्थ सेवेत जीवन समर्पित केलेले स. भ. मारुतीबुवा रामदासी हे विद्यापीठाचे कुलपती आहेत. त्यांचे श्रीसमर्थ वाङ्मयावरील व श्रीधरस्वामींवरील अनेक ग्रंथ व प्रवचनांच्या सीडीज प्रसिद्ध आहेत. अत्यंत साक्षेपी व समर्थ विचाराचे ते गाढे अभ्यासक आहेत. श्रीसमर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह म्हणूनही ते धुरा सांभाळत आहेत.

श्रीसमर्थ विद्यापीठ - प्रधान कार्यालय - सातारा

विद्यापीठाचे कार्य आता सातारा येथील प्रधान कार्यालयातून चालते. `समर्थ सदन', 179, सोमवार पेठ, राजवाड्याजवळ, सातारा या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्रशस्त जागेत विद्यापीठाचे कार्यालय आहे. विद्यापीठाच्या सर्व परिक्षांचे प्रवेश, निकाल व इतर सर्व प्रकारचे नियंत्रण प्रधान कार्यालयाकडून होते. कार्यालयाचे कामकाज कुलसचिव पहातात. त्यांचे बरोबर कार्यालय प्रमुख, कोषाध्यक्ष, अर्थविभाग प्रमुख, परीक्षा विभाग प्रमुख, समीक्षक विभाग प्रमुख, संगणक विभाग प्रमुख, वितरण विभाग प्रमुख हे सर्व सहकार्याने विद्यापीठाचे कामकाज पहातात. कुलसचिवांसह हे सर्व विभाग प्रमुख विनावेतन समर्थ सेवा म्हणून हे काम करतात.

विद्यापीठाद्वारे घेतल्या जाणा-या परीक्षा

श्रीसमर्थ सेवा मंडळाने समर्थ विद्यापीठाच्या कारभारासाठी, महाराष्ट्राच्या सर्व भागातील अत्यंत विद्वान समर्थभक्तांचे कार्यकारी मंडळ स्थापन केले आहे. या कार्यकारी मंडळाने `अभ्यासक्रम मंडळ' (बोर्ड ऑफ स्टडीज) नियुक्त केले आहे व त्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व समर्थ तत्त्वज्ञानाचे अभ्यासक समाविष्ट केले आहेत.

विद्यापीठाने पंचवीस वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या प्रसंगी कालमानास अनुसरुन विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमाचीही पुनर्रचना केली आहे व नवीन पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2013 पासून लागू केला आहे. अर्थातच जुना अभ्यासक्रम आता रद्द झाला आहे. म्हणून आता यापुढील परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसारच होतील.

याप्रमाणे शुल्क व पोस्टेज पाठविल्यावर या परिक्षांचे नियम व अभ्यासक्रमाचा तपशील, प्रवेश अर्ज असणारी पुस्तिका विद्यार्थ्यांस पाठविली जाईल. मनोबोध विशारद परिक्षेचे प्रवेश मात्र 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत दिले जातात व अंतिम निकाल पुढील ऑक्टोबरमध्ये दिला जातो.

समीक्षक

विद्यापीठाच्या समर्थबोध ते प्राज्ञ व मनोबोध विशारद या परिक्षांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यावर त्याला मार्गदर्शन करण्यासाठी व त्याची वार्षिक परीक्षा घेण्यासाठी समीक्षक नेमून दिले जातील. हे समीक्षकच त्यांची वार्षिक परीक्षाही घेतील, स्वाध्याय तपासतील व सर्वसाधारण मार्गदर्शन करतील.

परीक्षा पद्धती

विद्यार्थ्यांनी आपापल्या घरीच स्वाध्याय सोडवून समीक्षकांना सादर करावयाचे आहेत तसेच वार्षिक परीक्षाही घरीच प्रश्नपत्रिकेतील उत्तरे लिहून समीक्षकांना ती सादर करावयाची आहेत. समीक्षक विद्यापीठाकडे परीक्षांचे गुण व निर्णय कळवतील व विद्यापीठ एकत्रितपणे निकाल जाहीर करील. प्रशस्तिपत्रके विद्यापीठाकडून देण्यात येतील.

प्रत्येक परीक्षेला प्रवेश अर्ज, अभ्यासक्रम, स्वाध्याय, शुल्क, वेळापत्रक इत्यादी तपशीलवार माहिती त्या त्या परीक्षेच्या स्वतंत्र पुस्तिकेत दिली आहे. तरी प्रत्येक परीक्षार्थ्याने पुस्तिका नीट पाहून घ्यावी.

श्रीसमर्थ विद्यापीठाचे संघटन

श्री समर्थ विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेर पसरलेले आहे. म्हणून विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विद्यापीठ केंद्र प्रमुख, संपर्क प्रमुख अशा पदांवर पूर्णपणे विनावेतन, समर्थ सेवा म्हणून काम करणा-या व्यक्तींची विद्यापीठ नेमणूक करते. अशा व्यक्ती शाळा / महाविद्यालय व इतरत्रही प्रत्यक्ष भेटी देऊन संपर्क साधतात. विशेषत: शाळांतून जे मुख्याध्यापक / शिक्षक समर्थ विचारांचा प्रसार व्हावा म्हणून काम करु इच्छितात त्यांच्या सहकार्यानेच विद्यापीठाचे काम चालते. विद्यापीठातर्फे खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे -

`विद्यापीठाचे प्रतिनिधी शाळाशाळांतून भेटी देतील त्यांना मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी सहकार्य करावे.'

हे ईश्वरी कार्य आहे. भावी पिढी सुसंस्कारित, चारित्र्यसंपन्न व्हावी म्हणून समर्थ विद्यापीठाचा प्रयत्न आहे. या समर्थ सेवेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा ही विनंती.

कुलपती
श्रीसमर्थ विद्यापीठ, शिवथरघळ
संपर्क भ्रमणध्वनी
श्री. गरुड - 8806734187
श्री. बारटक्के - 9096709960
श्री. बाजी - 9421216359
सौ. किरपेकर - 9922776936